|
|
विकिपीडिया:सद्य घटना/मे २००८
|
बातमी प्रकाशन माहिती |
- बातमी देतांना दुवा देण्यास विसरू नका. दुवा नसलेल्या बातम्या काढून टाकल्या जातील.
- बातमी प्रकाशित करण्यासाठी {{बातमी}}चा उपयोग करा.
|
आजचे छायाचित्र दि. २१ ऑगस्ट २००८, गुरूवार
[संपादन] दि. ३१.०५.२००८
| सामूहिक विवाहांसाठी पात्रतेची खात्री न करता वाटले ४.४३ कोटी |
| शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये सामूहिक विवाहांसाठी अनुदान देताना लाभार्थ्यांच्या पात्रतेची खात्री न करता ४.४३ कोटींच्या मदतीचे वाटप झाल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला आहे. राज्य शासनाच्या पॅकेजमध्ये तणावग्रस्त शेतकर्यांना तत्काळ दिलासा देणार्या बाबींमध्ये सामूहिक विवाहांसाठी अनुदानाचा समावेश होता. सामूहिक विवाह कार्यक्रमाअंतर्गत विवाह करणार्या शेतकर्यांच्या मुलींना प्रत्येकी १० हजारांची मदत वस्तुरूपात देण्याची योजना होती. विवाहांचे आयोजन करणार्या गैरसरकारी स्वयंसेवी संस्थांना प्रतिजोडपी एक हजार रुपयांचे अनुदानही जाहीर करण्यात आले. त्याचसोबत लाभार्थींची पात्रता ठरविण्यासाठी काही अटीही घालण्यात आल्या. वधू आणि वर महाराष्ट्रातील रहिवासी असावे, वधू शेतकर्याची मुलगी असावी, अशा अटींचा समावेश करण्यात आला. वधू ही शेतकर्याचीच मुलगी असल्याचा पुरावा म्हणून रेशनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा इतर कागदपत्रे गाह्य धरणे अपेक्षित होते. कॅगने पाहणी केलेल्या १६ तालुक्यांमध्ये २००५ ते २००७ या कालावधीत सामूहिक विवाह योजनेअंतर्गत चार हजार २७ विवाहांवर ४.४३ कोटी रुपये खर्च झाले. लेखापरीक्षणात लाभ र्थींची पात्रता तपासून पाहिल्यावर वधूची ओळख केवळ शाळा सोडल्याच्या दाखल्यावरूनच करण्यात आल्याचे निदर्शनास आले. सहा जिल्ह्यांमध्ये २००५-०७ या कालावधीत झालेल्या १० हजार ७८६ सामूहिक विवाहांपैकी ८ हजार ३२९ प्रकरणांमध्ये (७७ टक्के) शासकीय आदेश असतानाही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व निबंधकांनी विवाह प्रमाणपत्रच दिले नसल्याचे आढळून आले. यातील धक्कादायक बाब म्हणजे, अमरावती भागातील तीन हजारांवर प्रकरणांमध्ये शासकीय आदेशाचे उल्लंघन करून गैरशासकीय संस्थांच्या माध्यमातून विवाहप्रमाणपत्रे दिली गेली. |
| सकाळ |
|
| राजस्थान अंतिम फेरीत |
| शेन वॅटसनच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा १०५ धावांनी पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. ५२ धावांची आक्रमक खेळी व १० धावांत ३ बळी मिळविणारा शेन वॅटसनच आजच्या सामन्याचा खरा हीरो ठरला. दिल्लीला विजयासाठी १९३ धावांचे आव्हान होते; मात्र त्यांचा डाव १६.२ षटकांत ८७ धावांतच गुंडाळला. |
| सकाळ |
|
| अज्ञात रेड इंडियन्सचे ब्राझीलच्या सीमेवर दर्शन |
| सुधारलेल्या जगाच्या अद्याप संपर्कात न आलेल्या रेड इंडियन जमातीतील एका समूहाचे नुकतेच ब्राझील आणि पेरूच्या सीमेवर दर्शन झाले. ऍमेझॉनच्या घनदाट जंगलात राहणार्या या जमातीची हेलिकॉप्टरमधून टिपलेली छायाचित्रे आज प्रसिद्धीस देण्यात आली. मात्र, पेरूतील जंगलतोडीमुळे या जमातीचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीतीही वर्तविण्यात आली आहे. अद्याप आदिम पद्धतीने जगणार्या शंभरावर जमाती सध्या जगात आहेत. त्यातील बहुसंख्य ब्राझील आणि पेरूमध्ये आहेत. मात्र, गेल्या तीन-चार शतकांत युरोपीय वसाहतवाद्यांशी संघर्ष आणि इतर कारणांमुळे रेड इंडियन जमातींचे अस्तित्व धोक्यात आले. या जमातींच्या संरक्षणासाठी ब्राझीलमधील विशेष खात्यातील (फुनाई) अधिकारी जोस कार्लोस रीस मेरिलेस ज्युनिअर यांना एका मोहिमेत नुकतेच अशा समूहाचे दर्शन घडले. सर्व्हायव्हल इंटरनॅशनल ग्रुपने ही मोहीम आयोजित केली होती. |
| सकाळ |
|
[संपादन] दि. ३०.०५.२००८
| नगर जिल्ह्यातील कोळसांगवीतील "साक्षी"वर बरसल्या नोटा |
| कोळसांगवी (ता. पाथर्डी) गावाने स्त्री जन्माचे स्वागत कृतीतून करून आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. गावाने कन्या शुभजन्म दिन योजना आखली असून, गावातील बहुतेक महिलांची मानसिकता नव्या उपक्रमाला अनुकूल आहे. "कन्या शुभ जन्मदिन" योजनेत सुमारे शंभर महिलांनी सदस्यत्व स्वीकारले आहे. गावात मुलगी जन्मली, की मंडळाच्या सदस्यांनी प्रत्येकी शंभर रुपये द्यावेत, असे बैठकीत ठरले. योजनेची पहिली लाभधारक कन्या म्हणून साक्षी संदीप पेटारेचा तिच्या आईसह सत्कार करण्यात आला. |
| सकाळ |
|
| छटपूजेसाठी मुंबईत येणारच - लालूंचे राज ठाकरेंना आव्हान |
| छटपूजेसाठी आपण मुंबईत येणारच आहोत. शिवाजी पार्कवर छटपूजा करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली, तर समुद्रावर जाऊन आपण छटपूजा करू. छटपूजा हा आमचा सण-उत्सव आहे. त्याला कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिआव्हान रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज येथे दिले. राज ठाकरे यांनी लालूंनी मुंबईत येऊन छटपूजा करून दाखवावी, असे आव्हान दिले होते. ते आज लालूंनी स्वीकारले आहे. ते म्हणाले, की आपण छटपूजा करणार आहे, असे प्रसिद्धिमाध्यमांशी बोललो होतो; मात्र माझ्या या विधानाचा विपर्यास्त करण्यात आला. राज ठाकरे यांच्या घराजवळ किंवा शिवाजी पार्कवर छटपूजा करणार आहे असे सगळीकडे पसरविण्यात आले; मात्र आता छटपूजा मुंबईत होणार आहे. तो आमचा सण आहे. |
| सकाळ |
|
| मराठी निर्मातीचा "डॉटर" हिंदी वितरक लॉबीमुळे रखडला |
| हिंदीमधील वितरकाच्या एका लॉबीने मराठी निर्मात्या- दिग्दर्शकांच्या "डॉटर" या चित्रपटाचे वितरण करण्यास नकार दिला आहे. मराठी माणसांच्या मुंबईत असा प्रकार घडणार असेल तर आम्ही जायचे कुठे, असा प्रश्न या चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकद्वयींनी केला आहे. वयात आलेल्या मुलांना दत्तक घेताना कोणत्या अडचणी उद्भवतात, यासारख्या सामाजिक विषयाला हात घालणार्या डॉटर या हिंदी चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकांना या चित्रपटाच्या वितरणासाठी वणवण करावी लागत आहे. निर्माते-दिग्दर्शक मराठी, त्यातच मराठी कलाकारांचा अधिक भरणा आणि एकूणच मराठी माहौल या चित्रपटात असल्यामुळे हिंदीमधील वितरकाच्या एका लॉबीने या चित्रपटाचे वितरण करण्यास नकार दिला आहे. मराठी माणसांच्या मुंबईत असा प्रकार घडणार असेल तर आम्ही जायचे कुठे, असा प्रश्न या चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकद्वयींनी केला आहे. |
| सकाळ |
|
| अवैध सावकारीवर बंदीची घोषणा ठरली पोकळ |
| अवैध सावकारांकडून कर्ज घेणार्या शेतकर्यांनी स्वतःला कर्जमुक्त समजण्याची शासकीय घोषणा प्रसिद्धीअभावी हवेतच विरल्याने शेतकर्यांना सावकारी कर्जाच्या बाबतीत दिलासा देण्यात सहकार खात्याला अपयश आल्याचा ठपका कॅगने अहवालात ठेवला आहे.योग्य कायदेशीर आधाराविनाच अवैध सावकारांविरुद्ध कारवाई केल्याने सहकार खाते याबाबतीत अक्षरशः तोंडघशी पडले आहे. शासनस्तरावर होणार्या घोषणा किती पोकळ असतात, याचा पाढाच कॅगने शेतकरी पॅकेजवरील लेखा परीक्षण अहवाल वाचला आहे. विदर्भात सावकारी कर्जाचे प्रमाण मोठे आहे. त्यापायी शेतकर्यांची अक्षरशः लूट होते. त्यावर उपाय म्हणून पॅकेजमधील तत्काळ करावयाच्या उपाययोजनांमध्ये सावकारी कर्जापासून शेतकर्यांना दिलासा देण्याच्या उपायांचाही समावेश होता. |
| सकाळ |
|
| वनविभाग अवैध मासेमारी रोखण्यास असमर्थ |
| वनकर्मचार्यांची अपुरी संख्या, वाहने, बोटी, हत्यारे चालविण्याचे प्रशिक्षण नसल्याने पेंच राष्ट्रीय उद्यानातील तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारी रोखण्यास असमर्थ ठरत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवरील पेंच नदीवर दोन्ही राज्यांतर्फे संयुक्तरीत्या तोतलाडोह जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. त्याकरिता ७,५०० हेक्टर वनक्षेत्रावर तोतलाडोह जलाशयाची निर्मिती करण्यात आली. ७,५०० हेक्टर पैकी २,५०० हेक्टर क्षेत्र राज्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात येते. जलाशयाचे क्षेत्र राखीव वन असल्याने त्याचा समावेश राष्ट्रीय उद्यान क्षेत्रामध्ये केला आहे. यामुळे या परिसरात १९९५ पासून मासेमारी बंद करण्यात आली आहे. तोतलाडोह जलाशय निर्मितीकरिता बाहेरून आणलेले मजूर व ठेकेदारांकरिता येथे तात्पुरती वसाहत उभारण्यात आली होती. १९९२ मध्ये तोतलाडोह संयुक्त प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यापैकी बहुतांश ठेकेदार व मजूर स्थलांतरित झाले. परंतु, सुमारे १,५०० मजूर कुटुंबासह अनधिकृतरीत्या राखीव वनांवर अतिक्रमण करून तात्पुरत्या वसाहतीजवळ राहिले. त्यांच्याकडून तोतलाडोह जलाशयात अवैधरीत्या मासेमारी करणे, अवैध वृक्षतोड, अवैध शिकार केली जात होती. |
| सकाळ |
|
[संपादन] दि. २९.०५.२००८
| थुंकणार्यांनी अखेर धुतले रस्ते |
| रस्त्यावर थुंकण्याबाबत परदेशामध्ये कडक शिक्षा होते असे अनेकदा सांगितले जाते. फक्त दंड भरून सुटका होत नाही, तर प्रसंगी रस्ता धुण्याची शिक्षाही भोगावी लागत असल्याने तेथे रस्त्यावर अस्वच्छता करण्याचे धाडसच कोणी करीत नाही. आत्तापर्यंत परदेशात घडणारी घटना आज पुण्यात घडली आणि ती देखील कोथरूडसारख्या गजबजलेल्या भागामध्ये. महापालिकेच्या अधिकार्यांनी केलेल्या प्रेमाच्या सक्तीमुळे रस्त्यावर थुंकणार्या काही नागरिकांनी चक्क पाण्याने रस्ता स्वच्छ केला आणि आपल्या गैरकृत्याबद्दल खर्या अर्थाने शिक्षा भोगली. पुणे महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयातील स्वच्छता कर्मचारी आणि अधिकार्यांकडून सध्या अशा प्रकारची कारवाई सुरू आहे. |
| सकाळ |
|
| गुज्जर आंदोलनाचे लोण राजधानीपर्यंत |
| गुज्जर समाजाने राजस्थानात सुरू केलेल्या आंदोलनाच्या झळा राष्ट्रीय राजधानी क्षेत्राला बसण्यास सुरवात झाली असून गुडगाव, मेहरौली भागात आंदोलकांनी रास्ता व रेल रोको केल्यामुळे हे लोण आज दिल्लीच्या दारापर्यंत पोचले आहे. गेल्या वर्षी केलेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उद्या हुतात्मा दिन पाळण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात उद्या आंदोलन करण्याचे राजधानीतील गुज्जर समाजाने ठरविल्यामुळे दिल्लीत सुरक्षा दलाचे सुमारे ३५ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. |
| सकाळ |
|
| पेट्रोल-डिझेल रेशनिंगचा इंडियन ऑइलचा इशारा |
| "देशात पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ केली नाही, तर पेट्रोलियम पदार्थांचे रेशनिंग करण्याखेरीज पर्याय उरणार नाही" असा इशारा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या देशातील सर्वांत मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने आज दिला. गेल्या तीन वर्षांत प्रथमच कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीला पेट्रोलियम पदार्थांची विक्री विशिष्ट पातळीवर थांबवावी लागेल, असे कंपनीचे अध्यक्ष सार्थक बेहुरिया यांनी स्पष्ट केले. |
| सकाळ |
|
| सहाव्या वेतन आयोगाची रक्कम टप्प्याटप्याने देण्याची शिफारस |
| सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना केंद्रीय कर्मचार्यांना टप्प्याटप्प्याने पैसे द्यावेत आणि त्यातील काही भाग भविष्यनिर्वाह निधीमध्ये गुंतवावा, अशी महत्त्वपूर्ण शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाने केली आहे. थकबाकीची रक्कम एकहाती दिल्यास उत्पादित वस्तूंची मागणी एकदम वाढून चलनवाढ आणखी फुगेल, असा दावा मंडळाचे प्रमुख आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर सी. रंगराजन यांनी केला आहे. "यापूर्वी वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना थकबाकीची रक्कम टप्प्याटप्प्यानेच देण्यात आली होती. या वेळी तसेच करावे; अन्यथा एकहाती रकमेमुळे ग्राहकोपयोगी (कन्झ्युमर) आणि उत्पादित (मॅन्युफॅक्चर्ड) वस्तूंची मागणी वाढून चलनवाढ आणखी वाढेल," अशी टिप्पणी त्यांनी सादर केलेल्या अहवालात असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे मंडळ पंतप्रधानांना विविध आर्थिक मुद्द्यांमध्ये सल्ला देण्याचे काम करत आहे. |
| सकाळ |
|
| मुंबईतच छटपूजेचा लालूंचा हट्ट! |
| ‘ अरे छटपूजा करायला येच तू... विमानतळाबाहेर कसा येतोस, तेच बघतो ?’, असं दणदणीत आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव यांनी काहीसं नमतं घेतलंय. शिवाजी पार्कवर छटपूजा करण्यात काही अडचण असेल तर मी कुठेतरी दूर समुद्रात छटपूजा करेन, अशी माघार त्यांनी घेतलेय. मात्र, छटपूजा मुंबईतच करण्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत.
राज ठाकरेंशी चर्चा करण्यास लालूंनी थेट नकार दिला. राज ठाकरेंकडे जाऊन त्यांची भेट घेण्याइतके ते कोण आहेत ?, असा खोचक सवाल त्यांनी केला. एका कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते.
विक्रोळी आणि शिवाजी पार्कच्या सभेत राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित केला. उत्तर प्रदेशी आणि बिहारी नेते छटपूजेच्या माध्यमातून मुंबई-महाराष्ट्रात आपली ताकद दाखवू इच्छितात, ही दादागिरी बंद झाली पाहिजे, असा ‘ आवाज ’ त्यांनी दिला. तेव्हापासून छटपूजा इथे रोजच ‘ साजरी ’ होत आहे . रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव यांनी राजच्या आव्हानाला प्रतिआव्हान दिलं, आणि शिवाजी पार्कात त्याच्या घराशेजारीच छटपूजा करण्याचं जाहीर केलं. त्यावर, ‘ येऊनच दाखवा ’ , अशी धमकी राज यांनी दिली.
|
| मटा. |
|
[संपादन] दि. २८.०५.२००८
| श्रीधर कांबळेकडून कागदपत्रे सादर |
| नासाचा संशोधक असल्याची तोतयेगिरी करणारा श्रीधर कांबळे याने सायंकाळी सव्वासहा वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात कागदपत्रे सादर केली. येथील अधिकारी बाजीराव पाटील यांच्यासह कोणीही वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित नव्हते. कार्यालयातील लिपिकांनी त्याच्याकडून कागदपत्रे स्वीकारली. श्रीधरला सामाजिक न्याय विभागाने कागदपत्रे सादर करण्यास काल उपस्थित राहण्यासाठी चार दिवसांपूर्वीच समन्स बजावले होते; मात्र तो काल आला नव्हता. आज त्याने येणार असल्याचे सांगितले होते. दिवसभर विभागाचे प्रमुख श्री. पाटील बाहेरच होते. त्यांनी कर्मचार्यांना श्रीधरकडून कागदपत्रे स्वीकारावीत, अशी सूचना केली. |
| सकाळ |
|
| गुज्जर आंदोलन चिघळले; राजस्थानच्या पंधरा जिल्ह्यांत "रा.सु.का." लागू |
| अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा यासाठी गुज्जर समाजाने पुकारलेले आंदोलन आणखी चिघळल्यामुळे राज्याच्या १५ जिल्ह्यांत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. या आंदोलनाची व्याप्ती दिल्लीच्या दारापर्यंत पोचल्यामुळे सरकारने आंदोलकांविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला.
आंदोलन करणार्या गुज्जर समाजाच्या नेत्यांनी दिल्ली आणि जम्मूकडे जाणार्या रेल्वेगाड्या रोखण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यानंतर राजधानीत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकार्यांची बैठक झाली. राष्ट्रीय राजधानी क्षेत्राला त्यामुळे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान सरकारने गुज्जरांना भटक्या समाजाचा दर्जा देण्याची सूचना केली होती. ती त्यांच्या नेत्यांनी फेटाळून लावली आणि आंदोलन पुढेही सुरूच ठेवले. यामुळे दिल्ली-आग्रा आणि दिल्ली-जयपूर मार्गावरील वाहतूक अडकून पडली आहे. या भागातील लोहमार्गही आंदोलकांनी रोखून धरले आहेत. त्यांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे सरकारने आंदोलनामुळे हिंसाग्रस्त बनलेल्या १५ जिल्ह्यांत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला. अजमेर, अलवार, बारन, भरतपूर, भिलवाडा, बुंदी, दौसा, धोलपूर, जयपूर, झालावार, झुनझूनू, करौली, कोटा, सवाई माधोपूर, टोंक या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना कायदा व सुव्यवस्था मोडणार्या कोणालाही त्वरित अटक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव व्ही. एस. सिंग यांनी दिली.
|
| सकाळ |
|
| चेन्नई उपांत्य फेरीत; मुंबई स्पर्धेबाहेर |
| महेंद्रसिंग धोणीच्या "चेन्नई सुपर किंग्स"ने "हैदराबाद डेक्कन"चा सात गडी पराभव केला आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांच्या या विजयामुळे "मुंबई इंडियन्स"चे आव्हान अखेरचा साखळी सामना शिल्लक असतानाच संपुष्टात आले. मुंबई इंडियन्सचा उद्या बंगळूरविरुद्ध सामना होणार आहे; परंतु या सामन्याला आता काहीही अर्थ राहिलेला नाही. चेन्नईने प्रथम फलंदाजी करणार्या हैदराबाद संघाला २० षटकांत ८ बाद १४७ धावांत रोखले आणि त्यानंतर विजयाचे हे आव्हान १९.२ षटकांत पार केले. सुरेश रैनाने झुंजार ५४ धावांची खेळी केली. अखेरच्या पाच चेंडूंत सहा धावांची गरज असताना रैनाने षटकार मारला, तोपर्यंत अखेरच्या दोन षटकांत सामना रंगतदार झाला होता. त्यामुळे मुंबईच्या पाठीराख्यांच्या नाडीचे ठोके वाढले होते. |
| सकाळ |
|
[संपादन] दि. २७.०५.२००८
| फिनिक्स यान मंगळावर उतरले - जीवसृष्टीचा शोध सुरू |
| मंगळावर जीवसृष्टीची शक्यता तपासण्यासाठी; तसेच तेथील पाणीसाठ्याची माहिती मिळविण्यासाठी नासाने पाठविलेले फिनिक्स अवकाशयान आज मंगळावर उतरले. यानाने तेथील छायाचित्रे पाठविण्यासही सुरवात केली आहे. मंगळावर पाण्याचे अंश सापडल्यानंतर तेथे जीवसृष्टी असण्याची शक्यताही वर्तविली गेली. ही शक्यता पडताळून पाहण्यासाठी नासाच्या शास्त्रज्ञांनी योजना आखली होती. त्यानुसार ४ ऑगस्ट २००७ रोजी फिनिक्सने मंगळाच्या दिशेने झेप घेतली. तब्बल दहा महिन्यांनंतर फिनिक्सने स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४ वाजून ५३ मिनिटांनी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. या वेळी यानाचा वेग प्रचंड होता. पॅराशूटच्या साह्याने वेग नियंत्रित केल्यानंतर हे यान मंगळाच्या उत्तर ध्रुवावर उतरले. |
| सकाळ |
|
[संपादन] दि. २६.०५.२००८
| कर्नाटकात भाजप प्रथमच स्वबळावर सत्तेवर |
| कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी ११० जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने दक्षिणेकडील राज्यात प्रथमच सत्तेच्या दिशेने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसने ८० जागा जिंकल्या, तर देवेगौडा पिता-पुत्रांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाला २८ जागांवर समाधान मानावे लागले. साध्या बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११३ जागांच्या जादुई आकड्यापासून भाजप थोडासा दूर असला, तरी या पक्षाने राज्यात सत्ता स्थापण्याचा दावा केला असून, येत्या बुधवारी (ता. २८) पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडीयुरप्पा यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील या यशामुळे भाजपने आपल्या दक्षिण दिग्विजयाच्या दिशेने दमदार पाऊल टाकल्याचे मानण्यात येत आहे. |
| सकाळ |
|
| ठाणे पोटनिवडणूक:आनंद परांजपे विजयी |
| ठाणे लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे आनंद परांजपे यांनी ९० हजार ८७२ मतांच्या मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवीत ठाण्यात आवाज शिवसेनेचाच, असे खणखणीत उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसला अक्षरशः चारीमुंड्या चीत केले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या नवी मुंबईसह बेलापूर मतदारसंघात संजीव नाईक यांना मताधिक्य मिळविताना अक्षरशः घाम फुटल्याचे चित्र या निकालानंतर पुढे आले. वाशी येथील कांदा-बटाटा बाजारातील लिलावगृहात झालेल्या मतमोजणीत परांजपे यांना चार लाख ६२ हजार ७६६; तर संजीव नाईक यांना तीन लाख ७१ हजार ८९४ मते मिळली. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन या मतदारसंघाचा कानाकोपरा पिंजून काढणारे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे. |
| सकाळ |
|
| जगातील सर्वांत मोठी जैवसंपदा धोक्यात |
| गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमा जिथे भिडतात, तिथे जगातील सर्वांत समृद्ध जैवविविधता पाहायला मिळते. या तीनही राज्य सरकारांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड सुरू असून, ही जैवसंपत्ती धोक्यात आली आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील हे घनदाट जंगल अनेक वन्यजीवांचे आश्रयस्थान आहे. पर्यावरणवाद्यांच्या म्हणण्यानुसार, जंगल माफिया आणि वणव्यांमुळे यातील अनेक एकर जंगल उजाड झाले आहे. या टापूत असणारे विर्दी गाव महाराष्ट्राच्या हद्दीत असून, दोन हजार वस्तीच्या या गावातील लोकांशी पर्यावरणवाद्यांनी जंगलाचा बचाव करण्यासंदर्भात अनेकदा चर्चा केली आहे. जैवविविधतेच्या जपणुकीसाठी घाऊक जंगलतोड थांबविण्याचे एकत्रित प्रयत्न गरजेचे असून, अनेक वनजमिनी खासगी मालकीच्या असल्याने हे काम अवघड बनल्याचे पर्यावरणवादी निर्मल कुलकर्णी यांनी सांगितले. राजकीय आणि सामाजिक हस्तक्षेपामुळेही वन अधिकारी फारसे काही करू शकत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. हजारो वन्य जीवांचे आश्रयस्थान असणारा आणि पश्चिम घाट म्हणून ओळखला जाणारा संपूर्ण प्रदेशच वाढती कारखानदारी आणि शहरीकरणामुळे धोक्यात असल्याचे त्यांनी नमूद केले. |
| सकाळ |
|
| तांदळाची आधारभूत किंमतही वाढविणार |
| गव्हाप्रमाणेच तांदळाची किमान आधारभूत किंमतही लवकरच वाढविण्यात येणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळ येत्या आठवडाभरात याबाबत निर्णय घेईल, असे ते म्हणाले. व्यवस्थितपणे कर्जफेड केलेल्या शेतकर्यांना नव्या कर्जासाठी व्याजदरात सवलत देण्यासंदर्भातील निर्णयही येत्या तीन-चार महिन्यांत घेण्यात येईल, अशी माहिती पवार यांनी दिली. |
| सकाळ |
|
|